Ad will apear here
Next
काचबिंदूमुळे होणारे अंधत्व रोखण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक
जागतिक काचबिंदू आठवड्यानिमित्त डॉ. विद्या चेलेरकर यांचा सल्ला
पुणे : ‘काचबिंदूवर वेळीच उपचार न केल्यास अंधत्वाची जोखीम निर्माण होऊ शकते आणि म्हणून आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे,’ असे मत एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील काचबिंदू सल्लागार डॉ. विद्या चेलेरकर यांनी व्यक्त केले.

जागतिक काचबिंदू आठवडा १० ते १६ मार्च २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने डॉ. चेलेरकर यांनी ही माहिती दिली. अंधत्वाचे दुसरे महत्त्वाचे कारण काचबिंदू आहे. ज्यामुळे जगातील आठ टक्के लोक अंध आहेत. भारतामध्ये या आजारामुळे १२ दशलक्ष लोक बाधित आहेत. त्यातील १.२ दशलक्ष लोकांना अंधत्व आलेले आहे. समुदायातील ९० टक्के लोकांमध्ये काचबिंदूचे निदान केले जात नसल्याने भारतामध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे समाजात काचबिंदूबाबत जागरूकतेचा अभाव किंवा गैरसमज आहे.

अधिक माहिती देताना डॉ. चेलेरकर म्हणाल्या, ‘काचबिंदूशी निगडीत जोखमीच्या घटकांकडे यामध्ये ४० वर्षांपुढील असलेले वय, कुटुंबात काचबिंदूचा असलेला इतिहास, जास्त प्लस किंवा मायनस असलेला चष्म्याचा नंबर, स्टिरॉइड औषधे किंवा डोळ्यांना अपघातामुळे झालेली इजा यांचा समावेश आहे. यात सर्वांत मोठे आव्हान म्हणजे काचबिंदूची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. डोळ्यांचे दृष्टीक्षेत्र दोन्ही बाजूने कमी-कमी होत जाणे ही पहिली लक्षणे असून, ते अगदी नंतरच्या टप्प्यात दिसून येतात. त्यामुळे नेत्रतज्ज्ञांकडून एक ते दोन वर्षांत डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.’

‘काचबिंदू होण्यापासून आपल्याला थांबविता येत नाही; पण वेळीच निदान व उपचार केल्यास आपण त्याला नियंत्रणात ठेऊ शकतो. लवकर उपचार झाल्यास काचबिंदूच्या प्रगतीचा वेग आपण कमी करू शकतो. म्हणूनच काचबिंदूने ग्रस्त असलेले रुग्ण जे नियमितपणे उपचार घेतात, तसेच डोळ्यांची नियमित तपासणी करून घेतात त्यांना सहसा अंधत्व येत नाही,’ असे डॉ. चेलेरकर यांनी सांगितले.

काचबिंदू हा एक स्वतंत्र रोग नसून तो रोगांचा गट आहे, ज्यामध्ये डोळ्यात असलेल्या द्रव्याचा दाब वाढून नेत्रचेतेला असाध्य नुकसान होते, जे नुकसान वेळेवर उपचार न झाल्यास भरून न येता कायम स्वरूपी अंधत्व देऊ शकते. नेत्रजलाची उत्पत्ती डोळ्यांतील गोलाकार काळ्या चकातीच्या मागील पोकळीत होते. तिथून ते पुढील पोकळीत येते हे द्रव्य डोळ्यांच्या आतील रचनांना पोषण देते व ट्रॅबेक्यूलर मेशवर्क नामक जाळीतून बाहेर जाते. सर्वसामान्य अवस्थेत डोळ्याचा दाब १५-२० मिमी पार्‍यापर्यंत असतो. वरील कुठल्याही जागी काही दोष निर्माण झाल्यास दाब वाढू लागतो व नेत्रचेतेला नुकसान होऊन नजरेवर परिणाम होतो. यालाच काचबिंदू असे म्हणतात.

प्रायमरी ओपन अँगल ग्लाउकोमा, प्रायमरी अँगल क्लोजर ग्लाउकोमा, डेव्हलपमेंटल ग्लाउकोमा (जन्मजात प्रकार), सेकंडरी ग्लाउकोमा (गौण प्रकार) हे काचबिंदूचे प्रकार आहेत. काचबिंदू हा हळूहळू वाढणार आजार असल्याने याची कुठली ठळक लक्षणे आढळून येत नाहीत. तुमचे डोळे अगदी निरोगी दिसू शकतात; परंतु कदाचित गंभीर प्रकारचा काचबिंदूचा विकार असू शकतो. चष्म्याचा नंबर वारंवार बदलावा लागणे, वाचन, लेखन वगैरे जवळची कामे करण्यास कष्ट पडणे आणि दृष्टिक्षेत्र हळूहळू कमीकमी होत जाणे ही लक्षणे असतात. समोर पाहिले असता स्पष्ट दिसते; पण बाजूची दृष्टी कमीकमी होत जाते.

अँगल क्लोजर ग्लाउकोमामध्ये किंवा अचानक वाढलेल्या दाबामुळे काही रुग्णांमध्ये पुढील लक्षणे दिसून येतात- डोळ्यांमध्ये अधूनमधून वेदना व डोकेदुखी जी अंधारात किंवा जवळचे काम केल्यावर जास्त वाढते. अंधुक दृष्टी, दिव्यांभोवती वलये दिसणे, डोळे अचानक लाल होणे. गौण प्रकार- बहुधा डोळ्याला झालेल्या इजेमुळे, रक्तस्त्राव झाल्यामुळे अथवा डोळ्यांच्या काही भागांच्या विकृतीमुळे हा प्रकार उत्पन्न होतो. दीर्घ काळ दमा, संधिवात यासाठी स्टेरॉइड्स घेतल्यासदेखील काचबिंदूची शक्यता वाढते. जन्मजात प्रकार- भ्रूणावस्थेत (प्रसूतिपूर्व अवस्थेतील बालजीवाच्या अवस्थेत) डोळयांची रचना नीट झाली नसल्यामुळे हा प्रकार दिसतो. यात डोळा व बुब्बुळ मोठे होते. यावर त्वरित उपचार न केल्यास बालकाला लहानपणीच अंधत्व येण्याची शक्यता असते. या आजारात डोळ्याचे वजन वाढते व डोळ्याच्या मागे असलेली नेत्रचेता अर्थात ऑप्टिक नर्व्ह अशक्त होत जाते. डोळ्यांना रक्तपुरवठा कमी होत जातो आणि दृष्टी क्षीण होते.

काचबिंदूची तपासणी अशी करता येते : व्हिजन- नजरेचा तपास, टोनोमेट्री- याद्वारे डोळ्यांचा दाब मोजता येतो. गोनिओस्कोपी- याद्वारे डोळ्यातील अँगल तपासता येतो. ऑप्टिक डिस्कची तपासणी- लेन्स व ओसीटी द्वारे. पेरिमेट्रीची तपासणी- याद्वारे दृष्टी क्षेत्र मोजता येते. पॅकीमेट्री- बुबुळांची जाडी मोजणे.

नियमित डोळे तपासणी करणे हाच काचबिंदूवरील सर्वोत्तम उपचार आहे. काचबिंदूमध्ये डोळ्यातील दाब कमी करण्यासाठी डॉक्टरांतर्फे ड्रॉप्स दिले जातात जे शक्यतो रुग्णास आयुष्यभर वापरावे लागतात. काही रुग्णांमध्ये लेझरद्वारे उपचार करून डोळ्यातील द्रव्य बाहेर पडण्यासाठी कृत्रिम मार्ग तयार केला जातो व दाब कमी करता येतो. ज्या रुग्णांमध्ये ड्रॉप्स व लेझरमुळे दाब कमी होत नाही त्यांच्यासाठी शस्त्रक्रियेचा उपाय उपलब्ध आहे. सध्या नवीन आलेल्या उपचार पद्धतीमध्ये एसएलटी लेझर, शंट सर्जरी, वाल्ह्व सर्जरीदेखील करता येऊ शकते. काचबिंदूमध्ये कुठल्याही उपचारांनी गेलेली नजर परत मिळवता येत नाही. म्हणून लवकर निदान व उपचार हेच केवळ काचबिंदूला तुमची नजर हिरावण्यापासून रोखू शकते. काचबिंदू नियंत्रणात ठेवता येतो त्यासाठी डॉक्टर सांगतील तसे नियमितपणे फेरतपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZRUBY
Similar Posts
‘योग्य सावधगिरीमुळे उन्हाळ्यात नेत्र रोगांपासून बचाव शक्य’ पुणे : कडक ऊन आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान यांचा डोळ्यांवर प्रभाव पडण्याची शक्यता असते. असे असले तरी सर्वांनी सावधगिरी बाळगल्यास उन्हाच्या तडाख्यापासून स्वत:च्या डोळ्यांचा बचाव करणे सहज शक्य असल्याची माहिती एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या कॉर्निया व कॅटरॅक्ट कन्सल्टंट डॉ. सीमा जगदाळे यांनी दिली
‘देसाई आय हॉस्पिटल’तर्फे आयोजित परिषद उत्साहात पुणे : दी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन्सच्या (पीबीएमए) एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्यातर्फे आणि महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटी व पूना ऑप्थॅल्मिक सोसायटी यांच्या सहयोगाने नुकतेच ‘१३व्या आय इंडिया कॉन्फरन्स २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कर्नल (निवृत्त) मदन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली झाली
देसाई आय हॉस्पिटलमध्ये सीबीएम फेको ट्रेनिंग सेंटर पुणे : एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये सीबीएम फेको ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरचे उद्घाटन १३ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी दोन वाजता हॉस्पिटलच्या शंकर साबळे सभागृहामध्ये कार्ल झाइस मेडिटेक एजीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लडविन मॉन्झ व सीबीएम जर्मनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ
‘रंगोत्सव साजरा करताना काळजी घ्या’ पुणे : होळी सण म्हणजे रंगांची उधळण. हा सण आबालवृद्धांना आकर्षित करतो; मात्र या उत्सवादरम्यान डोळे, त्वचा आणि केस यांची हानी होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language